Breaking News
मुंबई ः राज्यातील मुदत संपलेल्या 20 महापालिकांसह, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबरनंतरच सुरु होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जून व जुलैमध्ये घेतल्यास पावसामुळे ते अडचणीचे ठरेल असे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे सरकारला ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणारी सुनावणी दहा दिवस लांबणीवर पडल्याने राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकींचा फैसला आता 4 मे रोजी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रामुळे राज्य सरकारला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात निवडणुका घेणे कठीण असल्याचे कारण निवडणूक आयोगाने दिले आहे. महाराष्ट्रात पावसाळ्यात वादळी-वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये निवडणुका घेणे कठीण होईल. तसेच एवढ्या सगळ्या निवडणूका एकाच टप्प्यात घेणेही शक्य नाही. त्या दोन-तीन टप्प्यात घ्याव्या लागतील असेही आयोगाचे म्हणणे आहे. 4 मे रोजी जर ओबीसी आरक्षणावर निर्णय आला तर, त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात जून आणि जुलै जाईल. पावसामुळे जून-जुलैमध्ये निवडणुका घेणे शक्य नाही, असे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर या निवडणूकांचा बार उडणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai