Breaking News
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ; ओबीसी आरक्षणाविना होणार निवडणुका
नवी दिल्ली : दोन आठवड्यात महापालिका निवडणुक कार्यक्रम जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ओबीसी आरक्षण प्रकरणी एका आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, तात्काळ निवडणुका घ्या न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला असून आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
मार्च 2020 च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कोर्टानं दोन आठवड्यात महाराष्ट्रातील रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसंच तात्काळ या निवडणुका घेण्यात याव्यात असंही कोर्टाने यावेळी म्हटले आहे.
दरम्यान निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने कोर्टात म्हटले होते की पावसाळ्यात निवडणुका घेणं शक्य नाही. दरम्यान, अद्याप वॉर्ड रचनांचं काम पूर्ण झालेलं नाही त्यातच दोन आठवड्यात जर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर राज्य शासनाच्या अडचणी वाढणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत राज्याचे महा अधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकार काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या आदेशामुळे मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, कोल्हापुर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, सोलापुर, अमरावती, अकोला, नागपुर, मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai