Breaking News
मुंबईः आगामी काही दिवसांमध्ये वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसू शकतो. वीजदरात वाढ होण्याची भीती असून त्यासाठी आयात करण्यात आलेला कोळसा कारणीभूत ठरू शकतो. औष्णिक वीज केंद्रामध्ये वीजनिर्मितीसाठी लागणार्या कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 76 दशलक्ष टन कोळशाची आयात होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास वीज दरात प्रति युनिट 50 ते 80 पैशांची दरवाढ होऊ शकते. त्याचा भार सामान्य ग्राहकांवर टाकला जाण्याची भीती आहे.
देशात मॉन्सूनचं आगमन झालं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा अधिक जोर असणार आहे. या कालावधीत कोळशाचं उत्पादन आणि पुरवठा यावर परिणाम होतो. अशा स्थितीत सार्वजनिक क्षेत्रातली कोल इंडिया कंपनी वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी 15 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे तर, एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनदेखील 23 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. त्याशिवाय, काही राज्यातील वीज निर्मिती कंपनी आणि खासगी वीज निर्मिती कंपन्यादेखील 38 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादन ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कोळशाची मागणी पूर्ण करण्यास सक्षम नाही. त्यामुळे कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कोळसा आयात केल्याने वीजनिर्मितीचा खर्च वाढणार आहे. देशात विजेची मागणी वाढली आहे. त्या अनुषंगाने देशात कोळशाचं उत्पादन वाढलं नाही. मॉन्सून दरम्यान उत्पादन आणि वाहतूकही त्रासदायक ठरते. देशात विजेचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता कोळशाच्या आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातल्या वीज निर्मिती केंद्रात दररोज 2.1 दशलक्ष टन कोळशाचा खप आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरटी पॉवर प्लांट्स’ मधल्या कोळशाच्या साठ्याची माहिती घेत असते. त्यानुसार, 19 जुलै रोजी वीज केंद्रात 28.40 दशलक्ष टन कोळशाचा साठा होता तर वीज निर्मिती केंद्रात कोळशाची आवश्यकता याच्या दुप्पट आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai