Breaking News
प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात
मुंबई : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य पहिले पाऊल या उपक्रमातून घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-2023 पहिले पाऊल शाळास्तर उद्घाटन मेळावा 25 एप्रिल रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळेमध्ये पार पडला. यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे.
केसरकर म्हणाले की, मातृभाषेचा सतत अभिमान बाळगायला हवा. ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे आपण आपली मातृभाषा म्हणजेच माय मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राइल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. कारण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असे आवाहनही केसरकर यांनी केले. तसेच या उपक्रमातून घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai