Breaking News
मुंबई : शरद पवार यांचे आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन गुरुवारी झाले. पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि निर्णयाला विरोध करण्यात आला. शरद पवार आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया
यावेळी भाषण करताना शरद पवार म्हणाले 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याच दिवशी म्हणजे 1 मे 1960 रोजी मी पुणे शहर युवक काँग्रेसचा सभासद झालो. 1967 ते आजपर्यंत सतत कुठल्या ना कुठल्या पदावर मी अखंडीतपणे लोकप्रतिनिधित्व केले. मी एकूण 56 वर्षे सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली 24 वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील 1 मे 1960 पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली 63 वर्षे अविरत चालू आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील 3 वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील 1 मे, 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल. आपणास माहित आहे कि माझा अनेक स्वयंसेवी संस्थाच्या कामकाजामध्ये सहभाग आहे. माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai