Breaking News
जीपीएस यंत्रणा कार्यान्वित होण्यास आठवड्याचा कालावधी
नवी मुंबई ः शासनाने रेती व खडी वाहतूकदारांना 1 मे पासून जीपीएस यंत्रणा बंधनकारक केली आहे. बाजारात तेवढ्या मोठ्या प्रमाणात जीपीएस यंत्रणा पुरवठा उपलब्ध नसल्याने त्याचा फटका वाहतूकदारांना बसत आहे. त्याचबरोबर ही यंत्रणा लावल्यानंतर ती कार्यान्वित होण्यास 2 ते 8 दिवस लागत असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
सरकारने राज्यात अवैध रेती व खडी वाहतुक रोखण्यासाठी प्रत्येक वाहनावर जीपीएस प्रणाली लावणे बंधनकारक केले आहे. या प्रणालीमुळे गाडीमध्ये माल किती वाजता भरला याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांना सहज उपलब्ध होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती व खडी वाहतुकीला आळा बसणार आहे. त्याचबरोबर एका रॉयल्टीवर दोन फेरे मारण्याचा गोरखधंद्यालाही चाप बसणार आहे. त्यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर गौणखनिज उत्खन्नातून महसूल प्राप्त होणार आहे.
शासनाने याबाबत शासन निर्णय जाहीर केला असून त्याची अमंलबजावणी 1 मे पासून सुरु केली आहे. गाड्यांवर जीपीएस प्रणाली नसल्याने वाहतुकदारांना रॉयल्टी स्कॅन करणे जिकरीचे होत आहे. शासनाने जीपीएस प्रणाली लावण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असती तर बरे झाले असते असे वाहतुकदारांचे म्हणणे आहे. राज्यात जीपीएस यंत्रणा पुरवठा करणाऱ्या कंपन्या कमी असून शासनाच्या या निर्णयामुळे त्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारण्यास सुरुवात केली असल्याचे वाहतुकदारांची तक्रार आहे. त्याचबरोबर ही प्रणाली लावल्यानंतर ती कार्यान्वित होण्यास 2 दिवसांपासून आठवडाभराचा कालावधी लागत असल्याने वाहतुकदार त्रस्त झाले आहेत. आधीच मंदी व महागाईची झळ सोसत असलेल्या वाहतुकदारांना नव्या नियमांचा फटका बसला असल्याची चर्चा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai