Breaking News
मुंबई : महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते. हॉलिवुड मधील व्यक्तीमत्वाचे बॉलिवुडमध्ये स्वागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी गारसेट्टी यांचे स्वागत केले. भारत-अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ आदीबाबत चर्चा झाली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये जी 20 देशांच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मुंबई महानगरी सजली असून सुमारे एक हजारांहून अधिक ठिकाणी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबईत रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाला सुरूवात झाली असून दोन वर्षांत मुंबई खड्डे मुक्त करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai