Breaking News
मुंबई : राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागांमध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे; अशा तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानभवनाच्या प्रांगणात प्रातिनिधिक स्वरुपात पाच फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
विखे पाटील म्हणाले की, हे फिरत्या पशुवैद्यकीय पथक जीपीएस ॲक्टिव्हेटेड असून राज्यातील दीड कोटी पशुधन जपण्यासाठी हे महत्वाचे पाऊल राज्य शासनामार्फत उचलण्यात आले आहे. एका फिरते पशुवैद्यकीय पथकासाठी साधारणपणे 14 लाख 35 हजार खर्च येत असून एकूण 80 फिरते पशुवैद्यकीय पथके राज्यात कार्यान्वित होत आहेत. पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 1962 टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या राज्यस्तरावर स्थापीत कॉल सेंटरद्वारे पशुपालकांच्या फोन कॉल प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व व गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशु आरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुधन आजारी पडल्यास या पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेवून जावे लागते, पशुरुग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांश पशुपालकांना हा अधिक भार परवडणारा नसल्यामुळे या अभावी मृत्यु होवून पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. राज्यातील पशुधनाची क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे व त्याकरीता उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे असून हे पथक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai