Breaking News
नवी मुंबई ः महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या सात दिवसात कोकणातील प्रत्येक जिल्हयात शासनाने दिलेल्या सुचनांबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.
या सप्ताहात महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेेळेत पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी ‘'महसूल दिन'' साजरा करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थी/विद्यार्थीनींसाठी आवश्यक अशा ‘'युवा संवाद'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 ऑगस्ट रोजी अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, भूस्खलन, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मिळणारी नुकसान भरपाई, अशा परिस्थितीत घ्यावयाची काळजी या विषयांवर आधारीत ‘'एक हात मदतीचा'' या कार्यक्रमाचे आयोजन. 4 ऑगस्ट रोजी महसूल अदालीतींमधील प्रलंबित प्रकरणे, सलोखा योजना, जमिनी विषयक वाद, आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचा निपटारा अशा विषयांशी संबंधित ‘जनसंवाद' या कार्यक्रमाचे आयोजन. 5 ऑगस्ट रोजी सीमेवर तैनात सैनिक तसेच शहिदांच्या कुटूंबीयांना मदत, त्यांना जमीन वाटप, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘'सैनिक हो तुमच्यासाठी'' या कार्यक्रमाचे आयोजन. 6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘'महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद'' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी '‘महसूल सप्ताह सांगता समारंभ'' आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांचे नियोजन करून याबाबतची प्रचार व प्रसिद्धी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करून विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. कोकण विभागात हा महसूल सप्ताह यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उप आयुक्त दर्जाच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रमांना प्रसिध्दी देण्यासाठी सखोल माहिती असलेल्या तज्ञांच्या मुलाखती तसेच व्याख्यानाचे प्रक्षेपण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर करण्यात येईल. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करून नागरिकांना देण्यात येणार आहेत. या महसूल सप्ताहात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
महसूल सप्ताहनिमित्त आढावा बैठक
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या काळात महसूल सप्ताह कोकण विभागात मोठया प्रमाणावर साजरा करण्यात यावा यासाठी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिऱ्यांशी संवाद साधला. कोकण विभागात विशेषत: या सप्ताहात प्रत्येक जिल्हयात सातबाऱ्यावर महिलांचे नांव लावण्यात यावे, पालघर,ठाणे आणि रायगड या जिल्हयात आत्तापर्यंत 1 लाख 25 हजार कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. या सप्ताहात उर्वरित सर्व लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात यावे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. युवासंवाद कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा परिक्षेसाठी स्पर्धा परिक्षा केंद्रांवर कार्यक्रम घ्यावेत. प्रत्येक तालुक्यात महसूल दूत नेमण्यात यावे. याशिवाय मुख्यमंत्री संदर्भ पत्र हातावेगळे करण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai