
उद्यान विभागात घोटाळ्यांची मालिका
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 13, 2023
- 659
कामगार नेते मंगेश लाड यांची पोलीसांत तक्रार
नवी मुंबई ः महापालिकेचा उद्यान विभागातील घोटाळ्यांची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमदार मंदा म्हात्रे यांनी 8 कोटींचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर आता कामगार नेते मंगेश लाड यांनी 14 कोटींच्या अफरातफरींची तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिल्याने पालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. यावर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन 2021 मध्ये आ. मंदा म्हात्रे यांनी परिमंडळ 1 व 2 मधील एकात्मिक उद्यान देखभाल दुरुस्तीच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. पालिका आयुक्तांनी संबंधित तक्रारीवर चौकशी समिती नेमून सदर ठेके रद्द केले होते. काम न करताही देयके अदा केल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी त्यावेळी केला होता. पालिकेने नंतर ही कामे करण्यासाठी विभागवार 10 वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांनीही व पालकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने 14 कोटींची अफरातफर सदर कामात केल्याची तक्रार कामगार नेते मंगेश लाड यांनी पोलीस आयुक्तांकडे केल्याने प्रकरणाचे गांर्भिय वाढले आहे. पालिकेने एकात्मिक उद्यान देखभाल दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक बनवताना प्रती कामगार 2 हजार चौ.मी. चे क्षेत्र गृहित धरले होते. या क्षेत्रानुसार जर कामगारांची संख्या गृहित धरली तर त्याच्या निम्मे कामगार सदर कंत्राटदारांनी नेमले असून त्यांना देयके मात्र अंदाजपत्रकातील कामगारांच्या संख्येप्रमाणे देण्यात येत असल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. अंदाजपत्रकात प्रत्येक कामगाराला किमान वेतन अदा करण्याचे गृहित धरले असतानाही पालिकेचे ठेकेदार जवळजवळ 30 टक्के कामगारांना किमान वेतनाच्या निम्मे रक्कम अदा केली जात असल्याचा गंभीर आरोप संबंधित ठेकेदारांवर केला आहे. याबाबत त्यांनी सविस्तर पुराव्यासह तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्तांना केली आहे. पोलीस आयुक्त त्याची कशी दखल घेतात याकडे आता पालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचे लक्ष लागले आहे. याबाबत उद्यान विभागाचे उपायुक्त दिलिप नेरकर यांच्याशी तक्रारीबाबत संपर्क साधला असता सदर तक्रार लाड यांनी आयुक्तांकडे केलेली असून आयुक्त दौऱ्यावर आहेत. आयुक्त परत आल्यावर ते जे दिशानिर्देश देतील त्यानुसार लाड यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल.
उद्यान विभाग अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने सदर घोटाळा उद्यान विभागात झाला आहे. प्रती कामगार 2000 चौ.मी. काम करणे अपेक्षित असून त्यानुसार ठेकेदाराने नेमलेले कामगार हे मानकाच्या निम्मे आहेत. निम्मे कामगार असताना उद्यान विभागाने पुर्ण कामगारांचे वेतन ठेकेदारांना बहाल केले आहे. त्याचबरोबर 30 टक्क्यांहुन अधिक कामगारांना संबंधित ठेकेदारांनी किमान वेतन अदा केलेले नाही. - मंगेश लाड, समाज समता कामगार संघटना सचिव
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai