Breaking News
नवी मुंबई : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश गत आठवड्यात राज्याचे वनमंत्री तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने तोडक मोहिम सुरु केली आहे. यामध्ये ऐरोली सेक्टर-15 येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरावर देखील कारवाई करण्याचे षडयंत्र वनमंत्र्यांनी रचला असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच इच्छापूर्ती गणेश मंदिरावर कारवाई करण्याच्या प्रयत्न झाल्यास अयोध्येप्रमाणे ऐरोलीमध्येही रक्ताचे पाट वाहतील. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जवाबदार असेल, असा गर्भित इशारा चौगुले यांनी दिला आहे.
1995 मध्ये येथील रिक्षाचालकांनी एकत्र येऊन ऐरोली सेक्टर-15 परिसरात मंदिर उभारले होते. कलांतराने या मंदिरांचे पावित्र्य वाढू लागले. लोकवर्गणीतून मंदिराचे नव्याने रेखीव बांधकाम करण्यात आले आहे. लोकांची या मंदिरांबद्दल निष्ठा आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदूत्वाचा नारा देत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे वनमंत्री मंदिर तोडण्याची भूमिका घेत आहेत. त्यांच्याकडून छुपा वार केल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे. मंत्रालयापासून ते पालिका आयुक्तापर्यंत मंदिर तोडण्यासाठी वनमंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे. मंदिरावरील कारवाईचा घाट हा राजकीय आकस आणि कुटील भुमिकेमुळे केल्याचा आरोपही चौगुले यांनी केला आहे. जर इच्छापूर्ती गणेश मंदिरावर कारवाई करण्याच्या प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. अयोध्येतील राम मंदिराच्या वेळी जशी घटना घडली होती त्याच पध्दतीने ऐरोलीमध्ये देखील रक्ताचे पाट वाहतील. तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याला प्रशासन जवाबदार असेल, असा इशारा चौगुले यांनी दिला आहे.
मंदिर बचावासाठी येथील रहिवाशांची स्वाक्षरी मोहिम घेण्यात येत असून या स्वाक्षरीच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवणार आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, ठाणे लोकसभा युवकचे अध्यक्ष ममित चौगुले, नवी मुंबई युवासेनेचे अनिकेत म्हात्रे, माजी नगरसेवक आकाश मढवी, राजू कांबळे, माजी नगरसेविका नंदा काटे उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai