सर्व्हिस रोडसाठी ग्रामस्थ आक्रमक

नवी मुंबई ः वर्षभरापासून सायन-पनवेल मार्गाच्या सहा पदरी रुंदीकरणाचे काम सुरू आहे, या कामात रस्त्याला लागून असलेला सर्व्हिस रोडचा पर्याय ठेवण्यात आला नाही. शिवाय यापूर्वी वाशी गावातून येण्या-जाण्यासाठीचे जे पूर्वीपासूनचे मार्ग होते, तेही या कामामुळे बंद झाले आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाशी गावातील ग्रामस्थांचे वहिवाटीचे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना गावातून महामार्गावर आणि वाशी सेक्टर सहा-सात परिसरात जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. याविरोधात वाशी गावातील ग्रामस्थांनी सोमवारी एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सायन-पनवेल महामार्ग चालू असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले. योग्य तो पर्याय निवडण्यात आला नाही, तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

सायन-पनवेल महामार्गाच्या या रुंदीकरणात वाशी गाव येथे उड्डाणपूल उभारण्यात येत आहे आणि महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे, मात्र या कामामुळे सध्या अनेक अडचणींचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावातून बाहेर पडण्याच्या मार्गांसह वहिवाटीचे मार्ग बंद करण्यात आल्याने वाशी गावातील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. गावातील बहुतांशी नागरिकांचा व्यवसाय हा मासेमारी आहे. त्यामुळे त्यांना वाशी खाडीपुलापर्यंत जाण्यासाठी चांगला सर्व्हिस रस्ता, पादचारी मार्गाची गरज आहे, मात्र या मार्गाला वाशी गावाजवळ सर्व्हिस रोड देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर गावातून पूर्वी थेट महामार्गाला जोडता येत होते आणि वाशी सेक्टर 6-7मध्येही जाता येत होते, मात्र आता महामार्गाला जोडणारे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे गावातील मच्छिमार बांधव, शालेय विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, वाहनचालक यांची मोठी अडचण झाली आहे. यासाठी महामार्गावर गाडी घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांना आता वाशी सेक्टर-17च्या सिग्नलला वळसा घालून जावे लागते. गावात यायचे असेल तर मग वाशी रेल्वे स्थानकमार्गे केरळ भवनावरून जावे लागते. पुढे येतानाही हाच द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

त्यामुळे ग्रामस्थ आता संतप्त झाले आहेत. यापूर्वीही 20 मे रोजी वाशी गाव आणि वाशी शहरातील नागरिकांनी सायन-पनवेल महामार्गालगत सर्व्हिस रोडसाठी जनआंदोलन केले होते. त्यांचे कामही बंद पडले होते. सोमवारही वाशी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सायन-पनवेल महामार्ग चालू असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी वाशी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त गोवेकर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. देसाई यांना माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत, नगरसेविका फशीबाई भगत आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. गावातील ग्रामस्थांना जर मार्ग खुला करण्यात आला नाही, तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी निशांत भगत यांनी दिला.