Breaking News
मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले किंवा ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा करायची अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक गुरूवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार 24 जूनपासून इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासकमाची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलैदरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 24 जून ते 11 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. तसेच इयत्ता बारावी माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने 15 व 16 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीची लेखी आणि प्रात्याक्षिक व तोंडी परीक्षा 24 जून ते 8 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 24 जून ते 4 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावी व दहावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत . या संकेतस्थळावर 22 मे पासून उपलब्ध करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai