एपीएमसीतील कर्मचार्‍यांना दिलासा

सुरक्षा अधिकारी व माथाडी कामगार झाले कोरोनामुक्त 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुरक्षा अधिकारी व माथाडी कामगार कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. या घटनेमुळे बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचा-यांनाही दिलासा मिळाला.

बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. मार्केटमध्ये दिवसरात्र परिश्रम घेणार्‍या फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांना ही पंधरा दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एपीएमसी प्रशासनाने त्यांना तत्काळ उपचारासाठी रिलायन्स रूग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीला ही लागण झाली होती. या दोघांचे ही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कल्याणमध्ये ते रहात असलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. धान्य मार्केट मधील माथाडी कामगाराचे अहवाल ही निगेटिव्ह आले असून त्यांना ही घरी सोडले आहे. एपीएमसी प्रशासनाने 11 मे पासून पाचही मार्केट बंद करून औषध फवारणी सुरू केली आहे. प्रत्येक मार्केटमध्ये आरोग्य शिबिर घेतले जात आहे. बुधवारी धान्य मार्केटमधील जवळपास 550 जणांची आरोग्य तपासणी केली आहे.