स्वतःच्या दोन मुलांवर केला गोळीबार

उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

नवी मुंबई : सेवानिवृत्त पोलिसाने कौटुंबिक वादातून स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी ऐरोली येथे घडली. यामध्ये मोठ्या मुलाला तीन गोळ्या लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुसर्‍या मुलाच्या शरीराला घासून गोळी गेली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर रबाळे पोलिसांनी वडिलाला पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. 

सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऐरोली सेक्टर 3 येथील रो हाऊसमध्ये ही घटना घडली. त्या ठिकाणी राहणार्‍या भगवान पाटील या निवृत्त सहायक उपनिरीक्षक यांनी वसई येथे राहणार्‍या स्वतःच्या मोठ्या मुलाला काही कामानिमित्त घरी बोलावून घेतले होते. त्यानुसार मोठा मुलगा विजय हा घरी आला होता. यावेळी लहान मुलगा सुजय हा घरात होता. कौंटुबिक वाद टोकाला गेल्याने भगवान यांनी स्वतःकडील पिस्तूलमधून विजय याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी विजयच्या पोटात घुसली असून, दुसरी गोळी खांद्यातून आरपार गेली आहे, तर तिसरी गोळी हाताला लागून गेली. त्यानंतर भगवान यांनी लहान मुलगा सुजय याच्यावर गोळी झाडली असता त्याने स्वतःच्या बचावाचा प्रयत्न केल्याने त्याच्या पोटाला गोळी घासून गेली. भगवान हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी त्यांचे जप्त केले पिस्तूल पुन्हा त्यांना ताब्यात दिले होते. याच पिस्तूलमधून त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला. त्यात मोठा मुलगा विजय याची प्रकृती चिंताजनक आहे. रबाळे पोलिसांनी भगवान पाटील यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त केले आहे.