डॉ. शीतल आमटे करजगी यांची आत्महत्या

चंद्रपुर ः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर) आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची कन्या आहेत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. करजगी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणार्‍या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. 

काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे-करजगी या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी 20 नोव्हेंबर 2020 ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणार्‍या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते. या लाइव्हमध्ये त्यांनी कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं. या फेसबुक लाइव्हनंतर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला होता. त्यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचे आमटे कुटुंबीयांनी सांगितले. त्या नैराश्याविरोधात लढत होत्या असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटल होते. या निवेदनावर डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे आई वडील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी तसंच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश - डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सह्या केल्या होत्या.

डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसर्‍या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.