Breaking News
रायगड ः रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ 2021-22, ‘अभिनव ज्ञानमंदिर’ शाळा, उसरखुर्द ता.तळा येथे माध्यमिक विभागात कार्यरत असलेले शिक्षक मनोज सुतार यांना देण्यात आला. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद यंाच्यामार्फतही त्यांना ‘गुणवंत शिक्षक’ हा किताब बहाल करण्यात आला आहे. दोन पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मनोज गुरुजींवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कर्जत तालुक्यातील किरवली येथील शेळके बंधू मंगल कार्यालयात रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि शिक्षतेतर कर्मचारी अशा 2020 आणि 2021 मधील 90 जणांचा सन्मान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षक असणार्या आपल्या वडिलांकडून विद्येचे बाळकडु मिळालेले मनोज सुतार हे गेली 21 वर्ष रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी ‘अभिनव ज्ञानमंदिर’ शाळा, उसरखुर्द ता.तळा येथे 21 वर्ष अखंडपणे आपले ज्ञानदानाचे कार्य सुरु ठेवले आहे. केवळ एक शिक्षक म्हणूनच नाही तर समाजाप्रति असणार्या तळमळीतून त्यांनी अनेक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थी पालक-भेट, माजी विद्यार्थी भेट घडवून कौटुंबिक संबंध जोडले. गणित आणि विज्ञान हे किचकट विषय त्यांनी खेळीमेळीने शिकवून विद्यार्थ्यांना त्यात रुची निर्माण केली. शालेय विषयांव्यतिरिक्त त्यांना असलेली संगिताची आवडही त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जोपासली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला.
समाज आणि विद्यार्थ्यांनी नेहमीच मनोज सरांना आदर्श मानले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आता जिल्हा परिषदेनेही त्यांच्या कार्यावर यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराची मोहोर उमटवली आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेमार्फतही गुणवंत शिक्षक हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. संगीत,कला,क्रीडा यासारखे सर्व गुणसंपन्न असलेल्या या व्यक्तिमत्त्वाला आदर्श शिक्षक व गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळणे म्हणजे दुग्धशर्करायोगच आहे. मुळचे मौजे नानवली(ता.तळा) व इंदापुर (साईनगर),ता.तळा येथील रहिवाशी असलेल्या मनोज सुतार यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तळा तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस