कार्यक्रमांची माहिती आता डिजिटल बोर्डवर

वे नाट्यगृहात बसवणार डिजिटल इलेक्ट्रिक बोर्ड

नवी मुंबई : नवी मुंबईतील नाट्यरसिकांसाठी वाशीतील विष्णुदास भावे हे एकमेव नाट्यगृह आहे. जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकवर्ग आकर्षित करण्यासाठी या नाट्यगृहातील कार्यक्रमांची माहिती आता डिजिटल बोर्डवर प्रसिद्ध होणार आहे. यासाठी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर कंत्राट देण्यात येणार असून सदर प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे.

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार्‍या नाट्यप्रयोगाच्या अथवा कार्यक्रमांच्या जाहिरातीकरिता पारंपरिक पद्धतीनुसार सुवाच्च अक्षरामध्ये तज्ज्ञ ड्रॉइंग मास्टरमार्फत ब्लॅक बोर्डवर रोजच्या रोज जाहिरात लिहिल्या जात आहेत. डिजिटल जाहिरातीच्या माध्यमातून नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकवर्ग आकर्षित करण्यासाठी डिजिटल बोर्डवर जाहिरात केली जाणार आहे. डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डचा खर्च आणि देखभाल दुरुस्ती खर्च पाहता डिजिटल बोर्ड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर देण्यात येणार असून यामुळे महापालिकेचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. भावे नाट्यगृहातील नाटक अथवा कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी संरक्षक भिंतीवर 28 बाय सहा आकाराचा डिजिटल इलेक्ट्रिक बोर्ड बसवून त्यापैकी 10 बाय 6 आकाराच्या डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डवर नाट्यगृहामध्ये सादर होणारे नाट्यप्रयोग, कार्यक्रम अथवा महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येणार्‍या सूचना, योजनांबाबत माहिती अथवा कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उर्वरित 18 बाय 6 या जागेवर संबंधित संस्थेमार्फत खासगी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. डिजिटल बोर्ड बसविण्याचा खर्च, बसविण्याची कार्यवाही, देखभाल दुरुस्ती खर्च, विद्युत देयक खर्च, जाहिरातीस प्रसिद्धी देण्याकरिता ऑपरेटर खर्च संबंधित संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने महापालिकेचा अतिरिक्त खर्चदेखील टळणार आहे. तसेच यामुळे नागरिकांना भावे नाट्यगृहात सादर होणारे नाट्यप्रयोग आणि कार्यक्रमांची माहिती अत्याधुनिक डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डवर मिळणार आहे.