Breaking News
बहुउद्देशिय इमारत वापरात न येताच ठरली धोकादायक
नवी मुंबईः वाशी सेक्टर 14 येथील भुखंड क्र. 4 व 5 वर बांधण्यात आलेली बहुउद्देशीय इमारत वापरात येण्यापुवच धोकादायक म्हणून पालिकेने जाहीर केली आहे. पालिका आयुक्त शिंदे यांनी सदर इमारत तोडण्याचे आदेश शहर अभियंता विभागाला दिले आहेत. सदर इमारतीवर आतापर्यंत 4 कोटी 60 लक्ष खर्च महापालिकेने केला असुन वास्तुविशारद हितेन सेठी यांना त्यांचे सल्लागार शुल्क 4 टक्के अदा केले आहे. त्यामुळे या नुकसानीस वास्तुविशारद हितेन सेठी यांना जबाबदार धरुन त्यांचेकडून सदर रक्कम वसूल करावी व त्यांना ठराविक काळासाठी काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी सेक्टर 14 येथील भुखंड क्र. 4 व 5 वर बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी वास्तुविशारद हितेन सेठी यांची नेमणुक केली होती. हितेन सेठी यांना 23 नोव्हेंबर 2012 रोजी याबाबत कार्यादेश देण्यात आले असून त्यांना 4 टक्के सल्लागार शुल्क देण्याचे पालिकेकडून मान्य करण्यात आले होते. यामध्ये इमारतीचे आराखने तयार करणे, वर्किंग आराखने बनवणे, आरसीसी डिझाईन बनवणे, कामाचे अंदाजपत्रक बनवणे व कामावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी वास्तुविशारद हितेन सेठी यांच्यावर देण्यात आली होती. या कामाचे आतापर्यंत 16 लाख 80 हजार रुपये हितेन सेठी यांना देण्यात आले आहेत.
पालिकेने सदर काम मोक्ष कन्सट्रक्शन कंपनी यांना 6 कोटी 74 लाखाला दिले होते. सदर काम सुरु असताना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे आरसीसीस स्लॅब स्वतःच्या वजनाने वाकत असल्याचे नजरेस आल्याने संबंधित वास्तुविशारदाने सादर केलेले आरसीसी डिझाईन व्हिजेटीआय मार्फत तपासण्यात आले. यावेळी व्हिजेटीआयने आपण तपासलेले आराखने योग्य असल्याचे सांगत काम करताना स्लॅबवर दिलेल्या वरील स्लॅबच्या वजनाने सदर बाक आल्याचे नमुद करत आपले हात जबाबदारीतून झटकले आहेत. वास्तविक पाहता, व्हिजेटीआय सारख्या संस्थेने दिलेले कारण योग्य नसून सदर प्रकरणात त्यांचीही जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. गेली 13 वर्षे सदर इमारत धोकादायक अवस्थेत असून पालिकेचे कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत. त्यामुळे त्यानुकसानीची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून संबंधित वास्तूविशारद हितेन सेठी यांची कामात हलगज-निष्काळजीपणा व सदोष सेवेअंतर्गत त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. सदर धोकादायक इमारतीचे पाडकाम करुन नंतर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी प्रस्तावित करु असे आश्वासन पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले आहे.
वास्तूविशारद हितेन सेठी यांच्या निष्काळजीपणामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानुकसानीची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. या नुकसानीस वास्तुविशारद हितेन सेठी यांना जबाबदार धरुन त्यांचेकडून सदर रक्कम वसूल करावी व त्यांना ठराविक काळासाठी काळ्या यादीत टाकण्यात यावे. - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai