गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 13, 2025
- 307
घनकचरा व्यवस्थापनाकडून तिजोरीची सफाई
नवी मुंबई ः महापालिकेच्या घनकचरा विभागात कामावर नसतानाही सफाई कामगारांना घरबसल्या पगार देऊन शहरासोबत पालिकेच्या तिजोरीचीही सफाई करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत समाज समता कामगार संघटनेने पालिका आयुक्त व घनकचरा उपायुक्त यांचेकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई संबंधित ठेकेदारांवर करण्यात आलेली नसल्याने पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नवी मुंबई महापालिकेचे शहराच्या साफसफाईसाठी आठ विभागात 100 ठेकेदार कार्यरत असून त्यांचेकडे सूमारे 3500 कामगार कार्यरत आहेत. या ठेकेदारांकडे असलेले बहुतांश कामगार हजर नसतानाही किंवा ते दुसरीकडे काम करत असतानाही त्यांचा पगार घनकचरा विभागामार्फत काढण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या उलट तक्रार प्राप्त होऊनही घनकचरा उपव्यवस्थापक वारुळे व पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी कोणतीही कारवाई न केल्याने ‘हमाम मे सब नंगे’ असल्याचा प्रत्येय नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात दिसून येत आहे.
महापालिकेची कामगार संघटना समाज समता कामगार संघ यांनी 6 मे 2025 रोजी पालिका आयुक्त यांना ऐरोली गट क्र. 89 मध्ये 40 कामगार हजर नसतानाही त्यांना पालिकेतर्फे वेतन देण्यात येत असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये 52 कामगारांमध्ये 10 कामगार सुपरवायझर असून प्रत्यक्षात 15 ते 20 कामगारच काम करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. सरासरी 40 कामगारांचा प्रत्येकी 25000 रु. पगार मिळून एकूण 10 लाखांचा मासिक अपहार संबंधित ठेकेदार करत असल्याचा घणाघाती आरोप कामगार संघटनेनेच केल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाचे पितळ उघडे पडले आहे. त्याबरोबर या तक्रारीत त्यांनी गट क्र. 95 मध्येसुद्धा अशाच प्रकारचा घफला सुरु असल्याचे आयुक्तांच्या निर्देशनास आणून दिले आहे.
पालिकेच्या एकूण 3500 कामगारांपैकी प्रत्यक्षात 2000 कामगाराच कामावर येत असल्याचे कामगारांचे म्हणणे असून उर्वरित कामगारांचा पगार पालिका अधिकारी व ठेकेदार हे संगनमताने पालिकेतून काढत असल्याचे सांगत आहेत. कामगार कमी असल्याने संपुर्ण शहराचा भार ठराविक कामगारांवर असल्याची व्यथा त्यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना व्यक्त केली. गैरहजर कामगारांना 200 रुपये देऊन उर्वरित 800 रुपये पगार त्यांच्याकडून रोख परत घेत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. एका ठेकेदाराचे 10 कामगार एमबीपी कंपनीत कामावर असतानाही त्याचा पगार पालिकेने अदा केल्याची धक्कादायक बाब कामगारांनीच उघडकीस आणली आहे. या घोटाळ्यात सॅनेटरी इन्स्पेक्टर, पालिका उपायुक्त घनकचरा व वरिष्ठ अधिकारी यांची साखळी असल्याचा आरोप संबंधित कर्मचारी करत आहेत. या कैलास पर्वताएवढ्या भ्रष्टाचाराची दखल पालिका आयुक्त घेतील का असा प्रश्न नवी मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेत एकुण 3500 सफाई कर्मचारी असून सूमारे 2000 कर्मचारीच संपुर्ण पालिका क्षेत्राची सफाई करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून पालिकेने संपुर्ण ठेक्यांचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा समता समाज संघटना कर्मचाऱ्यांच्या हितार्थ आंदोलन करेल. - मंगेश लाड, सरचिटणीस, समाज समता कामगार संघ
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai