वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 07, 2025
- 288
नवी मुंबई ः वाशी खाडीवरील 6 पदरी पूल सुरु झाल्याने आता यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबई व नवी मुंबई शहरांतील अंतर आता कमी होणार आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या दोन नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या ठाणे पूल क्रमांक 3 चे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व आमदार मंदा म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या नव्या पुलाच्या वापरामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतीमान आणि सुरळीत होणार आहे. उद्घाटनानंतर लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने 2 समांतर पुलांची संकल्पना राबवली. यातील पहिला मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पूल ऑक्टोबर 2024 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. तर दुसरा वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा पूल आता वापरासाठी खुला झाला आहे. या पूलाची एकूण लांबी 1837 मीटर आहे. मुंबईकडील पोहोच मार्ग 380 मीटर आहे. मार्गिका (लेन्स) प्रत्येकी 3 लेन्सचे 2 पूल अशा 6 मार्गिका आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 559 कोटी रुपये खर्त आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली.
ठाणे खाडीवर आधीपासून मानखुर्द-वाशी दरम्यान दोन पूल कार्यरत आहेत. या नवीन पूलामुळे इतर दोन पुलांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारूपाला आला आहे.
- नव्या पूलामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे वाशी ते विमानतळादरम्यानचा प्रवास आता 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार आहे. यामुळे व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- या पूलावरुन दररोज सुमारे अडीच लाख वाहने येजा करतात. यासाठी 30 मिनिटे इतका सरासरी प्रवास वेळ लागतो. हा वेळ आता 10-15 मिनिटांवर येणार आहे. यामुळे दरमहा अंदाजे 8 कोटी रुपयांची इंधन बचत होणार आहे. उत्सर्जनात घट होऊन रोजची सुमारे 12 टन बचत होईल. कनेक्टिव्हिटी दिल्याने रोजचा 15 ते 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
- या विकासात्मक प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबईमधील दळणवळण अधिक गतिमान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झालंय. भविष्यातील वाहतूक आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा खाडी पूल एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai