720 पथकांव्दारे करणार आरोग्य सर्वेक्षण

50 लाख घरांना भेट देऊन करणार माहिती संकलीत

नवी मुंबई ः कोव्हीडमुक्त महाराष्ट्राचे ध्येय असणार्‍या माझे कुटुंनब माझी जबाबदारी ही मोहिम नवी मुंबईतही प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 720 हून अधिक पथकांच्या माध्यमातून 5 लाखाहून अधिक घरांना भेटी देऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक पथक दररोज 50 घरांना भेट देऊन माहिती संकलीत करेल अशा प्रकारे पथके तयार करण्यात आलेली आहे.

कोव्हीडमुक्त महाराष्ट्राचे ध्येय नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार ’माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर असा पहिला टप्पा आणि 14 ते 24 ऑक्टोबर असा दुसरा टप्पा अशी दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत असून पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 720 हून अधिक पथके नेमली आहेत. त्यांच्याद्वारे नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक पथक दररोज 50 घरांना भेट देऊन माहिती संकलीत करणार आहे. या एका पथकामध्ये दोन ते तीन कर्मचारी / स्वयंसेवक असणार असून त्यांस ’करोना दूत’ असे संबोधले जाईल. या पथकाव्दारे घरोघरी भेटी देऊन घरातील प्रत्येकाचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजले जाणार आहे. त्याचप्रमाणे, घरातील एखाद्या व्यक्तीला ताप , खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्‍वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत काय याचीही माहिती संकलित केली जाणार आहे. ही सर्व माहिती पमध्ये दाखल केली जाणार असून सर्वेक्षण झाल्यानंतर घराला एक स्टिकर लावण्यात येणार आहे. गृहभेटी दरम्यान कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेताना शासन निर्देशानुसार सामान्य व्यक्ती (कोव्हीड पूर्व व्यक्ती), कोव्हीड पॉझिटिव्ह व्यक्ती आणि कोव्हीड होऊन गेलेली व्यक्ती अशा तीन प्रकारांमध्ये माहिती संकलित केली जाणार आहे व त्यांच्या प्रकारानुसार त्यांस आरोग्य संदेश दिले जाणार आहेत. सर्वेक्षणांतर्गात 14 ते 23 ऑक्टोबरच्या दुसर्‍या टप्प्यात पथक पुन्हा घरांना भेटी देऊन दुस-यांदा सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजणी करेल व नोंदी घेईल तसेच आरोग्य स्थिती लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करेल. या सर्वेक्षणातून संकलीत होणार्‍या माहितीच्या आधारे पुढे महानगरपालिका क्षेत्रातील सहव्याधी (कोमॉर्बिड) असणार्‍या वा इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत व योग्य उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे.