जाहिरात शुल्कापोटी लाखो रुपये थकविणार्‍या एजन्सींना नोटीसा

थकित रक्कम न भरल्यास महिना दोन टक्के विलंब शास्ती 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बसेसवर जाहिरात प्रसिध्द करण्याचा ठेका देण्यात आलेल्या मे. श्री ऍडर्व्हटायझिंग ऍन्ड मार्केटिंग या ठेकेदाराला सदर ठेक्याच्या कालावधीतील महापालिकेला जाहिरात शुल्कापोटी भरावयाची सुमारे 51 लाखांची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी एनएमएमटीच्या परिवहन व्यवस्थापकांनी नोटीस बजावली आहे. सदर रक्कमेचा त्वरीत भरणा न केल्यास सदर रक्कमेवर प्रति महिना दोन टक्के दराने विलंब शास्ती आकारण्याचा इशारा परिवहन विभागाने नोटीसीत दिला आहे.  महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यातील 358 बसेसच्या बाहेरील पॅनेलवर जाहिरात प्रसिध्द करण्याचे हक्क ठेकेदारी पध्दतीने मे. श्री ऍडर्व्हटायझिंग ऍन्ड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला नोव्हेंबर 2016 ते मार्च 2021 या कालावधीकरिता नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) दिले आहे. यात 290 बसेस 7. 75 चौ.मी. आणि 68 बसेस 4. 79 चौ.मी. लांबीच्या एकूण 358 बसेसचा समावेश आहे. एनएमएमटी बसेसवर जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी महापालिकेच्या परवाना विभागाचे शुल्क भरुन परवानगी घेणे संबंधित ठेकेदाराला बंधनकारक असताना गेल्या 4 वर्षांपासून मे. श्री ऍडर्व्हटाझिंग ऍन्ड मार्केटिंग या ठेकेदाराने परवाना विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आणि जाहिरात परवाना शुल्क रक्कमेचा गत चार वर्षांपासून भरणा केला नसल्याचे महापालिकेच्या परवाना विभागास निदर्शनास आले आहे. सदर बाब परवाना विभागाने एनएमएमटी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देवून सदर ठेक्याची माहिती उपलब्ध करुन घेतली. त्यानंतर परवाना विभागाचे उपायुक्त योगेश कुडूस्कर यांनी परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांना पत्र लिहून मे. श्री ऍडर्व्हटायझिंग ऍन्ड मार्केटिंग या ठेकेदाराकडे ठेक्याच्या कालवधीकरिता एनएनएमटीच्या 358 बसेसवर केलेल्या जाहिरातीपोटी एकूण 50 लाख 71 हजार 273 रुपये जाहिरात शुल्क, विलंब शुल्क व दंड म्हणून आकारणी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.  तसेच सदर थकित रक्कमेची संबंधित ठेकेदाराकडून वसुली करुन सदर रक्कमेचा भरणा तत्काळ महापालिकेच्या लेखा विभागात करावा. शिवाय सदर रक्कम भरण्यास ठेकेदाराने विलंब केल्यास विलंब शुल्कापोटी प्रति महिना 2 टक्के प्रमाणे विलंब शास्ती आकारण्यास सांगितले आहे.  

दरम्यान, महापालिकेच्या परवाना विभागाने परिवहन व्यवस्थापनाला दिलेल्या पत्राची प्रत संबंधित ठेकेदाराला देऊन थकित रक्कमेचा भरणा करण्यास सांगितले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने थकित रक्कमेचा भरणा न केल्याने सदर थकित रक्कमेचा भरणा करण्याची नोटीस संबंधित ठेकेदारास बजावली असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली.  

बस थांब्यावरील जाहिरात शुल्कही थकित  

नवी मुंबई महापालिका हद्दीतील एनएमएमटीच्या 154 बस थांब्यांवर 1 एप्रिल 2019  ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षात प्रसिध्द करण्यात येणाऱया जाहिरातींचे जाहिरात शुल्क थकविल्याप्रकरणी मे. रोनक ऍडर्व्हटायझिंग या एजन्सीकडूनही सुमारे 14 लाख 64 हजार रुपयांची थकबाकी येणे बाकी असल्याने महापालिकेच्या परवाना विभागाने 28 फेब्रुवारी 2020 रोजी एनएमएमटी व्यवस्थापकांना व संबंधित एजन्सीला कळविले होते. मात्र आजतागायत मे. रोनक ऍडर्व्हटायझिंग एजन्सीने सदर थकबाकीचा भरणा केला नसल्याचे महापालिकेच्या परवाना विभागाने स्पष्ट केले. या थकबाकी व्यतिरिक्त गत सहा महिन्यातील जाहिरात शुल्काची थकबाकीही संबंधित एजन्सीकडून येणे आहे.