दोन अनधिकृत इमारतींवर हातोडा

सिडको व पालिकेची संयुक्त कारवाई 

नवी मुंबई : कोरोनाकाळात अनधिकृत बांधकामांवरील कारवाई बंद झाल्याने अनेक भागात बेकायदेशीर इमारती उभ्या राहिल्या आहेत. आत सिडको आणि पालिकेने पुन्हा कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. बुधवारी घणसोली ‘एफ’ विभागात नव्याने आरसीसी अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या दोन इमारतींवर दुपारी सिडको आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

लॉकडाऊनमध्ये सिडको, महापालिका कोरोना विरुद्ध लढाईत गुंतले होते. याचा फायदा घेत भुमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला आहे. मात्र आता पालिकेने आपला मोर्चा पुन्हा तोडक कारवाईकडे वळवला आहे. गेल्या आठवड्यात पालिकेने तुर्भे येथील चार मजली इमारतीवव हातोडा चालविला. गेल्या आठ दिवसांपासून सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून घणसोली गावठाणात नवीन अनधिकृत बांधकामांचे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणात अनेक नवीन अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले असल्यामुळे सर्वेक्षणानंतर घणसोलीत अर्जुन वाडी परिसरात सिडकोने बुलडोझर फिरवून कारवाईला सुरुवात केली आहे. चार मजल्यांची एक आणि दुसर्‍या इमारतीच्या तळमजल्याचे आरसीसी कॉलमचे नवीन बांधकाम सुरू असल्यामुळे या दोन्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍या भूमाफिया आणि विकासक दलालांचे धाबे दणाणले आहे. कारवाईसाठी सिडकोच्या वतीने रबाळे पोलीस ठाण्याचे 39 कर्मचारी, 6 अधिकारी, 15 सुरक्षा रक्षक, सहा सुरक्षा अधिकारी, सीआरएफ चार जवान यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.