पुण्याच्या तरुणाची कळंबोलीत हत्या?

नवी मुंबई : कळंबोलीत एका उद्यानात पहाटे तरुणाचा मृतदेह आढळला. गळा आवळून त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा तरुण पुण्यातील चाकणवरुन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. नागनाथ कल्लपा माने असं या तरुणाचं नाव असून तो 31 वर्षांचा होता.

कळंबोलीत मॉर्निंग वॉकला केलेल्या एका व्यक्तीला पहाटे साडेपाचच्या सुमारास उद्यानात एक तरुणाचा मृतदेह दिसला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या तपासात मृत तरुण हा पुण्यातील चाकणवरुन आल्याची माहिती समजली. नागनाथ माने कळंबोलीतील नातेवाईकांच्या घरी जाणार असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. परंतु नातेवाईकाकडे न जाता त्याचा मृतदेहच कळंबोळीतील उद्यानात सापडला. मृत तरुणाच्या गळ्यावर खुणा असून गळा आवळून त्याची हत्या झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे डीसीपी शिवराज पाटील यांनी सांगितले.

पहाटे साडेपाच वाजता एका व्यक्तीने मृतदेह आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर कळंबोली पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपास केला असता हा तरुण पुण्यातील चाकणचा रहिवासी असल्याचं समोर आलं. तपासासाठी तीन पथकं स्थापन केली असून याचा शोध सुरु आहे, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.