डाळींचे भाव पुन्हा घसरले

चणा डाळ 60, तूर डाळ 90 रुपये किलो

नवी मुंबई ः मागील काही दिवसांपासून डाळींच्या भावाने उच्चांक पातळी गाठली होती. मात्र आता मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव पुन्हा घसरु लागले आहेत.परदेशातून आयात वाढल्याने याचा परिणाम डाळींच्या किंमतीवर झाला आहे. डाळींचे भाव आता 30 रुपयांनी कमी झाले असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

गेल्या महिन्यात डाळीच्या दरात विक्रमी भाव वाढ झाल्याने तूरडाळ 100 ते 120 रुपये, मूगडाळ 120 ते 140 किलोवर तर हरभरा डाळ 85 ते 95 रुपये किलोवर पोहोचली होती. ऐन सणासुदीत भाववाढ झाल्याने तिन्ही डाळी खरेदी करण्यासाठी अधिक खिसा हलका करावा लागणार होता. तुरीच्या आयातीसाठी दालमिलला केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे परवाने कोरोना काळात तीन महिने थांबवून ठेवल्याने बाजारात तूर डाळीचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने भाववाढ झाली होती. डाळींचे भाव गगनाला भिडल्याने ऐन दसरा -दिवाळीमध्ये महागाईने तोंड वर काढले होते. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून 3.6 लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुरीच्या भावात प्रतिकिलो 25 रुपयांची घसरण होऊन भाव 9,500 रुपयांवर स्थिरावले. पंधरा दिवसांत तूर डाळ प्रतिकिलो 25 ते 30 रुपयांनी घसरली. तसेच 120 ते 140 रुपये किलो विकली जाणारी मूगडाळ आता 90 ते 95 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. दीड महिन्यात हरभरा डाळीचे भाव क्विटंलमागे 2 हजार रुपयांनी वाढून 75 ते 80 रुपये किलोवर पोहोचले.

मात्र, बाजारात ग्राहकांचा अभाव असल्याने हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो 85 रुपयांवरुन 60-65 रुपयांपर्यंत घसरण झाली. सध्यातरी परदेशातील आयातीमुळे भाव कमी झाले असले तरी येणार्‍या एक दीड महिन्यात महाराष्ट्रमधील डाळींचे पिक हातात आल्यावर अजून किंमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.

डाळी 15 दिवसांपूर्वीचे दर सद्याचे दर (प्रति किलो)
तूर डाळ     130-135            85-90
चना डाळ     80-85                   60-65
मूग डाळ     120-125           80-85
मसूर डाळ     75-80                   60-65
उडीत डाळ     120-125           85-90