पालिका आयुक्तांनी घेतली कोरोना लस

नवी मुंबई ः शासन निर्देशानुसार कोव्हिड 19 लसीकरणाला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 16 जानेवारीपासून सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 24788 कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टरांसह इतर आरोग्यकर्मी तसेच दुसर्‍या टप्प्यात पोलीस, सुरक्षा, शासन, महापालिका यामधील पहिल्या फळीतील कोरोना योद्धे यांना कोव्हीड-19 लसीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अपोलो रुग्णालयात कोव्हीड 19 लस घेतली.

कोव्हीडची लस अत्यंत सुरक्षित असून ज्यावेळी कोव्हीड लसीकरण आहे असा संदेश मोबाईलवर येईल त्यावेळी आपले कोव्हीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे कोव्हीड-19 चा विषाणू आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मास्क, सुरक्षित अंतर तसेच वारंवार हात धुणे अथवा सॅनिटायझर वापरणे ही आरोग्य सुरक्षेची त्रिसूत्री काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आयुक्तांनी प्रामुख्याने सूचित केले. कोव्हीडची लस संपूर्णतः सुरक्षित असून आत्तापर्यंत लसीकरण झालेल्या कोणालाही त्रास झालेला नाही हे लक्षात घेऊन नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगतानाच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोव्हीडची लस घेतली तरी जोपर्यंत कोव्हीड बाधितांचा आकडा शून्यावर येत नाही व सर्वांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत मास्क, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ करणे ही आपली दैनंदिन नियमित सवय बनविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.