4 रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर होणार मोफत उपचार

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नमुंमपा क्षेत्रातील 4 रुग्णालयांचा समावेश

नवी मुंबई ः म्युकरमायकोसिसने बाधीत रुग्णांना उपचाराकरिता आर्थिक भार पडू नये यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 18 मे 2021 च्या शासन निर्देशानुसार म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. योजनेअंतर्गत नवी मुंबई पालिका क्षेत्रातील 4 रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे या रुग्णालयातील पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सध्या कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या आजारावरील उपचारामध्ये हुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत असल्याने याकरिता येणारा खर्च जास्त आहे. रुग्णांना उपचाराकरिता आर्थिक भार पडू नये यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 18 मे 2021 च्या शासन निर्देशानुसार म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 4 रुग्णालये अंगीकृत असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय सेक्टर 10 वाशी, डॉ. डि वाय पाटील हॉस्पिटल सेक्टर 5 नेरुळ, इंद्रावती हॉस्पिटल सेक्टर 3 ऐरोली, तेरणा हॉस्पिटल सेक्टर 22 नेरुळ या 4 रुग्णालयांचा समावेश आहे. या उपचारांमध्ये अँण्टीफंगल औषधे हा महत्वाचा भाग असून ही औषधे महाग आहेत. त्यामुळे सदर औषधे शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहित कार्यपध्दती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रुग्णालयातील पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. म्युकरमायकोसिस आजारावरील तपासणी महानगरपालिकेच्या वाशी, ऐरोली व नेरुळ या तिन्ही रुग्णालयातील म्युकरमायकोसिसच्या विशेष ओपीडीमध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली असून वाशी रुग्णालयात या आजारावरील उपचार मोफत करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी म्युकरमायकोसिस संबंधित लक्षणे जाणवल्यास त्वरित नजीकच्या पालिका रुग्णालयातील ओपीडीमध्ये विनामूल्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.