102 दगडखाणी पुन्हा धडधडणार

नवी मुंबई ः मागील पाच वर्षापासून काही तांत्रिक कारणामुळे दगडखाणी बंद होत्या. यामुळे हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला होता. प्रकल्पग्रस्तांच्या 102 दगडखाणी पुन्हा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संबंधित घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको आणि प्रकल्पग्रस्त दगडखाण मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. या दगडखाणी बंद असल्याने 35 ते 40 हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या दडगखाणी सुरु करण्यासाठी भुमीपत्र प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे राज्य शासनाने दगडखाणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्याने दगडखाणी संदर्भात असलेल्या सर्व घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षांपासुन प्रतिक्षेत असलेले हे प्रकरण अखेर मार्गी काढण्यात महत्वाची भूमिका घेतल्याने महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, नरेश गौरी, पंडित पाटील, हरिश्चंद्र घरत, निलेश केकावत, दिलीप मढवी, प्रमोद घरत, विलास जाधव, सोनू जूनेजे, प्रवीण लाड, मनोज पाटील, भरत भाई, साईनाथ पाटिल यांच्यासह शिष्टमंडळाने मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले.