घणसोली-ऐरोली मार्गासबंधी परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

नवी मुंबई ः ठाणे-बेलापुर मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी खाडीकिनारी वाशी-ऐरोली-घणसोली नवी न रस्ता प्रस्तावित आहे. मात्र गेल्या 12 वर्षांपासून त्याचे काम रखडले आहे. हे काम जलद गतीने सुरू करण्याची विनंती खासदार राजन विचारे यांनी केली असता त्यावर मुख्य सचिव विकास खारगे यांनी नवी मुंबई महानगरपालिका व कांदळवन कक्ष यांची संयुक्त स्थळ पाहणी व सर्वेक्षण आणि सीमांकन करून परिपूर्ण प्रस्ताव 25 ऑगस्ट 2021 पर्यंत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्तरीय अधिकारी नागपूर यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या मार्गाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. 

वनखात्याची परवानगी न मिळाल्याने ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या महापालिका हद्दीतील विकास कामांमध्ये अडथळा येत होता. यासाठी नुकताच खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खाडीकिनारी वाशी-ऐरोली-घणसोली या मार्गावर नवीन रस्ता घणसोली पर्यंत सिडकोने 12 वर्षापूर्वी अपूर्ण अवस्थेत ठेवलेला होता. सदर मार्गावर कांदळवन असल्याने परवानगी मिळत नसल्याने सदर रस्ता नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. नवी मुंबई महानगरपालिकेने सदर मार्गावर 1.95 किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या विनंतीनुसार सदर पुलासाठी सिडको 50 टक्के व नवी मुंबई महानगरपालिका 50 टक्के निधी उपलब्ध करून देणार असा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम जलद गतीने सुरू करण्याची विनंती खासदार राजन विचारे यांनी या बैठकीत केली. त्यावर मुख्य सचिव विकास खारगे यांनी नवी मुंबई महानगरपालिका व कांदळवन कक्ष यांची संयुक्त स्थळ पाहणी व सर्वेक्षण आणि सीमांकन करून परिपूर्ण प्रस्ताव 25 ऑगस्ट 2021 पर्यंत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्तरीय अधिकारी नागपूर यांच्याकडे सादर करावा व त्यानंतर त्यांनी सदर प्रस्ताव 30 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रादेशिक कार्यालय केंद्रीय पर्यावरण वने व जलवायू परिवर्तन मंत्रालय नागपुर यांच्याकडे सादर करावा असा निर्णय घेण्यात आला.

गवळीदेव व सुलाईदेवी या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी तसेच पामबीच मार्गालगत सायकल ट्रॅक उभारणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली त्यावेळी सदर दोन्ही प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणी आपण प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नागपूर यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सदर प्रस्ताव 15 ऑगस्ट 2021 पर्यंत मान्यता मिळेल या अनुषंगाने कार्यवाही करावी असे निर्णय यावेळी घेण्यात आले. यावेळी गायमुख ते फाउंटन उन्नत मार्ग, घोडबंदर ठाणे महानगरपालिकेचा सर्विस रस्ता या संदर्भातही चर्चा करण्यात आली. या बैठकीला ठाणे महापालिका आयुक्त डॉ. बिपिनकुमार शर्मा, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सचिव देबडवार व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, तसेच वनविभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक केंद्रस्थ अधिकारी नागपूर नरेश झुरमुरे, ठाणे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे असे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.