सेन्सेक्सची भरारी

गाठली 38 हजारांची ऐतिहासिक पातळी

मुंबई : मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने गुरुवारी विक्रमी झेप घेत घेतली. आज सकाळी व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 114.85 अंकांनी वधारत 38 हजारांवर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टीनेही 11500 ची पातळी ओलांडली. दोन आठवड्यांपूर्वीच सेन्सेक्सने 37 हजाराची पातळी ओलांडली होती. तेव्हापासून भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. सकाळच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली आहे. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  नव्याने झालेली परदेशी गुंतवणूक, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व नैसर्गिक वायू कंपन्यांच्या समभागांनी केलेल्या कामगिरीमुळे सेन्सेक्स या पातळीवर पोहोचल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा भारताच्या विकासदरासंबधी आश्वासक अहवालही यासाठी फायदेशीर ठरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.