स्वच्छता रन ला उत्स्फूर्त प्रतिसाद

5400 हून अधिक जणांचा समावेश

नवी मुंबई ः ‘माझी नवी मुंबई, माझा अभिमान’ म्हणत हजारो स्वच्छताप्रेमी नागरिक स्वयंस्फुर्तीने ‘स्वच्छता रन’ मध्ये सहभागी झाले आणि नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन घडवत हा स्वच्छतेचा संदेश मनापासून प्रसारित केला.  ‘महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छ भारत मिशन’ च्या चौथ्या वर्धापननिमित्त 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणार्‍या स्वच्छता हीच सेवा उपक्रमांतर्गत पालिकेच्या वतीने एकत्र धावूया प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी हा संदेश प्रसारित करण्यासाठी नेरूळ येथील वझिराणी स्पोर्टस् क्लब सर्कलपासून महापालिका मुख्यालय इमारतीपर्यंत पामबीच रोडवर ‘स्वच्छता रन’ चे आयोजन करण्यात आले होते. या रनमध्ये 5400 हून अधिक नागरिकांनी सहभागी होत हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमापूजन करून पारितोषिक वितरण समारंभाचा प्रारंभ झाला.   

याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेता रविंद्र इथापे, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के, आणि विविध विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

जर्मनीतील बर्लिन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मॅरेथॉनमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून सहभागी झालेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डेने विक्रमी नोंद घेतलेल्या मॅरेथॉन धावपटू क्रांती साळवी तसेच गोव्याचे किनार्‍यावं म्युझिक अल्बम फेम सुहृद वाडेकर व सिध्दी पटणे तसेच महानगरपालिकेच्या स्वच्छता जिंगलच्या गीतकार धनश्री देसाई यांची याप्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती.  

5 किमी अंतराची ही स्वच्छता रन अग्रक्रमाने पूर्ण करणार्‍या विजेत्यांनी मान्यवरांच्या शुभहस्ते विजेतेपदाची पदके व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. सहभागी सर्वच नागरिकांनी वय विसरून उत्स्फुर्तपणे 5 किमीचे अंतर पार केले. महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाचीही रनमध्ये उत्साही सहभाग होता, त्यामधून विजेत्या नगररचनाकार सतिश उगीले व महापालिका कर्मचारी प्रशांत भोईर यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सेवाभावी वृत्तीने स्वच्छता कार्यात नियमित सहभाग घेणार्‍या रॉबीनहूड आर्मी या संस्थेचे प्रमुख दिपक सिंग यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.