256 वेगवान वाहनांवर कारवाई

नवी मुंबई ः वाहतूक शाखेला देण्यात आलेल्या इंटरसेप्टर या अत्याधुनिक वाहनाच्या मदतीने वेगाची मर्यादा ओलांडणार्‍या 256 वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच काळ्या काचा लावलेल्या 40 वाहनांवर शीव-पनवेल महामार्ग आणि पाम बीच रस्त्यावर कारवाई करण्यात आली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने होणारे अपघात रोखण्यासाठी राज्यभरात वाहतूक पोलिसांना इंटरसेप्टर व्हेईकल पुरविण्यात आली आहेत. नवी मुंबई वाहतूक शाखेला सध्या अशी दोन वाहने पुरविण्यात आली आहेत. ती शीव-पनवेल महामार्ग आणि पाम बीच मार्गावर सज्ज असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. सध्या तरी इंटरसेप्टर व्हेईकलच्या मदतीने वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर आणि वाहनांच्या काचांना काळ्या पट्टया (फिल्म) लावणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या खिडकीच्या काचांना काळ्या फिल्म लावण्याची परवानगी आहे. मात्र स्थानिक पुढारी, त्यासह काही गब्बर कार्यकर्ते वाहनांच्या काळ्या फिल्म लावून गावोगाव, शहरात फिरत आहेत. अशा फिल्म बसवायच्या असल्यास त्या किमान 30 टक्के पारदर्शक असायला हव्यात, असा सामान्यांसाठी दंडक आहे. मात्र या नियमाला तिलांजली देत अनेक जण खिडक्यांच्या काचांना काळ्या पट्टया लावत आहेत.

काळ्या काचा -40

काचांवर काळी पट्टी लावलेली वाहने.- 24

वाहने पाम बीच मार्गावर - 16

वाहने शीव-पनवेल महामार्गावर