Breaking News
अतिरिक्त आयुक्त पवार व शहर अभियंता देसाई यांनी केली पाहणी
नवी मुंबई ः 13 मे रोजी सायं. 4 नंतर आकस्मिक वादळ व पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेत महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला आणि अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांना नैसर्गिक नालेसफाईच्या कामांची पाहणी करुन त्यांना गती देण्याचे निर्देश दिले होते.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरु असलेल्या नमुंमपा क्षेत्रातील 77 लहान मोठया नैसर्गिक नाल्यांची सफाई तसेच अभियांत्रिकी विभागामार्फत सुरु असलेल्या चार मोठया नाल्यांची सफाई यांचा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि शहर अभियंता संजय देसाई यांनी आढावा घेतला असता सरासरी 85 टक्के नालेसफाई पूर्ण झाली असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित नालेसफाई तत्परतेने पूर्ण करुन साफसफाई पूर्णत्वाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. महत्वाचे म्हणजे नाल्यांमधून काढून काठावर ठेवण्यात येणारा गाळ काहीसा सुकल्यानंतर लगेचच तिथून हलवावा व या कामात हलगर्जीपणा करु नये असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे सफाई करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधने पूरवावीत व त्यांचा वापर कामगारांकडून केला जात असल्याची खातरजमा करावी असेही निर्देशित करण्यात आले. सीबीडी से-12 येथील पंपहाऊसची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी सुरु असलेली पंपहाऊसची कामे तसेच विदयुत कामे त्वरीत पूर्ण करुन घ्यावीत असे निर्देश देण्यात आले. सायन पनवेल हायवे खालून हर्डिलिया कंपनी जवळील लक्ष्मीवाडी नजिकचा मोठा नाला साफ करताना हायवेखाली छोटया मशीनचा प्रभावी वापर करुन कामाला गती देण्याचे सूचित करण्यात आले. पारसिक हिल व रमाबाई आंबेडकर नगर येथील दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करुन त्या भागातील झोपडया स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले. सीबीडी से 5 व 6 या जमिनीच्या पातळीपासून खाली असणाऱ्या सखल भागात अतिवृष्टी आणि उधाण भरतीची वेळ जुळून आल्यास पाणी साठण्याची संभाव्यता लक्षात घेऊन त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपांची व्यवस्था करुन ठेवण्याचे सूचित करण्यात आले. से.3 व से.9 सीबीडी बेलापूर येथील नालेसफाईचीही पाहणी करुन सदर कामे गतीमानतेने पूर्ण करावीत असे निर्देशित करण्यात आले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आठही विभागातील नालेसफाई तसेच पावसाळापूर्व कामे अंतिम टप्प्यात असून अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता ही कामे त्वरीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देत आहेत. या पाहणीप्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai