कर्करोग शिबिराला उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई ः कर्करोगाची वाढती समस्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका याविषयी जनजागृती व प्रत्यक्ष कार्यवाही करीत असून समाज विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील 111 प्रभागांमध्ये महिलांसाठी विशेष कर्करोग तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

या अनुषंगाने जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी वृंदासाठी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी टाटा मेमोरियल सेंटरचे क्ट्रॅक उप संचालक डॉ. नवीन खत्री यांनी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये व नियमित तपासणी करून घ्यावी असा सल्ला दिला. भारतात पुरुषांमध्ये मौखीक कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती देत त्यादृष्टीने जागरुकता राखण्याची तसेच  स्वयंतपासणी व वैद्यकीय तपासणी करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कर्करोग निदान झाल्यानंतर पूर्ण उपचार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कर्करोगावर जिद्दीने मात करणार्‍या अलका देवेंद्र भुजबळ यांच्या कर्करोग झाल्यापासून बरे होईपर्यंतच्या काळाचा आढावा घेणारा माहितीपट ’कॉमा’ प्रदर्शित करण्यात आला. या काळाविषयी अनुभवकथन करताना अलका भुजबळ यांनी कुटुंबातील इतरांची, समाजाची काळजी घेण्याची महिलांची सर्वसाधारण मानसिकता असते, त्यामध्ये त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे केवळ त्या महिलेचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचीच हानी होते. म्हणूनच महिलांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज त्यांनी विषद केली. आरोग्याविषयी खूप जागरूक असताना कर्करोग निदान झाल्यावर हादरून गेले असे सांगतानाच आजाराकडे सकारात्मकतेने बघितले, यात कुटुंबियांची खूप साथ लाभली हे त्यांनी आवर्जून सांगितले. कर्करोग रूग्णाला समाजाने धीर देणे गरजेचे असल्याचे सांगत समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली व नवी मुंबई महानगरपालिका कर्करोगविषयक राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.