महाआघाडीला बंडखोरीची धास्ती

पक्षांतर करणार्‍या उमेदवारांच्या उत्साहावर विरजण

नवी मुंबई ः वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या पार पडलेल्या कार्यकर्त्यांचा मनोमिलन सोहळ्यात सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत बंडखोरी न करण्याचे आवाहन केले, तसेच महाआघाडी जो उमेदवार देईल त्यांना निवडून देण्याची विनंती त्यांनी केली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बंडखोरीच्या धास्तीचे महाआघाडीतील चित्र समोर आल्याने त्यात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. 

येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून, राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर होणारी राज्यातील ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. ही निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने एकत्र लढवण्याचे निश्‍चित केले असून, त्यादृष्टीने जागावाटपाची बोलणी या अगोदरच तिन्ही पक्षात सुरू आहेत. दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे, यादृष्टीने मंगळवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात महाआघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, अर्थमंत्री व गृहमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. या वेळी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती सभागृहात लावली होती व हे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या नेत्यांचा जयजयकार करत होते. 

कार्यकर्त्यांच्या या भावना लक्षात घेऊन तीनही पक्षांच्या मंत्र्यांना उपस्थित कार्यकर्त्यांना महाआघाडीचा जयजयकार करावा, असे वारंवार सांगावे लागत होते. अजित पवार यांनी या वेळी नवी मुंबईकरांच्या प्रलंबित प्रश्‍नांना महाआघाडी न्याय देईल असे सांगून, राज्यात आणि महापालिकेत एकच पक्षाचे सरकार निवडून देण्याची विनंती नवी मुंबईकरांना केली. ही निवडणूक तीन पक्ष एकत्र लढवणार असल्याने सर्वच इच्छुकांना उमेदवारी देता येणार नसल्याचे सांगत महाआघाडी देईल तो उमेदवार निवडून देण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांनी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना केली. ज्या सक्षम उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, त्यांना महापालिकेची परिवहन समिती, पालिकेच्या इतर समित्या तसेच राज्यातील इतर महामंडळांत सामावून घेण्याचे आमिष दाखवण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनीही 111 जागा तीन पक्षांच्या उमेदवारांना द्यायच्या असल्याने सर्वांनी संयमाने व एकजुटीने ही निवडणूक लढवून नाईकांची महापालिकेवरील 25 वर्षांची सत्ता घालवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यांनीही बंडखोरी न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 

महाआघाडी मेळाव्यात उपस्थित तीनही पक्षांचे नेते गणेश नाईकांविरुद्ध प्रखर प्रतिक्रिया देऊन कार्यकर्त्यांत जोश भरतील, अशी अपेक्षा असलेल्यांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा या वेळी सभागृहात होती. महाआघाडीत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम कार्यकर्त्यांना न देता याउलट तीनही मंत्र्यांनी महाआघाडीला भेडसावत असलेल्या बंडखोरीची धास्ती व्यक्त करून भविष्यात महाआघाडीत येऊ इच्छिणार्‍या उमेदवारांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाआघाडीतील नेत्यांची भाषा ऐकून महाआघाडीत जाऊ इच्छिणार्‍या उमेदवारांनी फेरविचार करण्याची शक्यता राजकीय समीक्षक व्यक्त करत आहेत.