Breaking News
बेलापुर येथील रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी
नवी मुंबई ः नवी मुंबईत सध्या निवडणुकीच्या तोंडावर शहर अभियंता विभागाने कामांचा सपाटा लावला आहे. यातून अधिकारी व संभाव्य उमेदवार यांचे चांगभले होत असल्याचा आरोप सध्या नवी मुंबईत होत आहे. बेलापुर विभागात सुरु असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या दर्जाबाबत भाजप नेते सुधीर पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करुन पालिका आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गेल्या वर्षभरात पालिका शहर अभियंता विभागाने कामांची झोड उठवली आहे. सजग जागरुक मंचचे अध्यक्ष सुधीर दाणी यांनी कशाप्रकारे अनावश्यक कामे काढली जात आहेत याकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. अनेक कामांचे तुकडे करुन आयुक्तांच्याच मंजुरीने सदर कामे होत असल्याने दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न सध्या नवी मुंबईकरांना पडला आहे. सुस्थितीतील गटारे, पदपथ, रस्ते खोदुन पुन्हा नव्याने बांधण्यात येत आहेत. तेच ठेकेदार व फाईली मंजुरीसाठी फिरणारे तेच माजी नगरसेवक असे चित्र सध्या नवी मुंबई महापालिकेत दिसत आहे.
वन टाईम वर्क अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने सूमारे 150 कोटी रुपये खर्च करुन सीबीडी येथील सेक्टर 11,12 येथे कामे केली होती. तेथील रस्ते, पदपथ अत्यंत सुस्थितीत असतानाही नव्याने रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. या कामांचा दर्जा चांगला नसल्याची तक्रार भाजप नेते सुधीर पाटील यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. यामध्ये डांबरीकरणाच्या माध्यमातून बीएम व ॲस्पाल्ट काँक्रिट रस्त्यावर टाकण्यात येत असून त्याची जाडी नियमानुसार नसल्याची बाब त्यांनी आयुक्तांच्या नजरेस आणून दिली आहे. या कामाचे परिक्षण त्रयस्त संस्थेमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली असून चौकशी पुर्ण झाल्याशिवाय कामाची देयके देण्यात येऊ नयेत असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पालिका आयुक्ता याबाबत कोणती कारवाई करतात याकडे अभियांत्रिकी विभागाचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai