कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणी चौकशीला वेग

पनवेल : तळोजा फेज 1 च्या सेक्टर-9 येथील एका बंद घरामध्ये शनिवारी चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. त्यानुसार आत्महत्या केलेल्या या कुटुंबीयांच्या नातेवाइकांची चौकशी करणार असल्याचे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी सांगितले.

शनिवारी दिल्ली येथील नितेश उपाध्याय याने आपली पत्नी बबली उपाध्याय, मुलगी नव्या आणि मुलगा ओम यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांच्या नातेवाइकांचा शोध चालू केला होता. अखेर त्यांचे नातेवाईक दिल्ली येथे असून त्यांच्याशी पोलिसांचा संपर्क झाला आहे. या प्रकरणी या नातेवाइकांचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे. सोमवारी उपाध्याय यांचे नातेवाईक दिल्लीहून तळोजा येथे येणार असून हे मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकणी अधिक तपास सुरू आहे. 

तब्बल दीड महिन्यापूर्वी हत्या व आत्महत्येचा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. असे असले तरी शिव कॉर्नर सोसायटीतील मयत कुटुंबाचे शेजारी व इतरांना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. दीड महिन्यापासून रूम आतून बंद असतानाही शेजार्‍यांनी एकदाही चौकशी केली नाही. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांचीसुद्धा पोलिसांकडून झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.