Breaking News
वाहनांचे मोठे नुकसान ; जिवितहानी टळली
नवी मुंबई ः वाशी सेक्टर 17 येथे वाशी प्लाझा या इमारतीची सायन-पनवेल महामार्गालगत असणारी संरक्षण भिंत सोमवारी दुपारी खचली. यामध्ये पार्किंग केलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
वाशी सेक्टर 17 येथील वाशी प्लाझा ही कमर्शियल सोसायटी लँड मार्क म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये अनेक खाजगी कार्यालये, क्लासेस तसेच संगणक, लॅपटॉप, मोबाईलची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. सोमवारी सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे या सोसायटीची सायन-पनवेल महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणारी संरक्षित भिंत खचली. या दुर्घटनेमुळे तेथे उभ्या असलेल्या 10-12 दुचाकी व एका टेम्पोंचे नुकसान झाले. दुचाकी व टेम्पो खचलेल्या भागात अडकल्याने तात्काळ अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत कोसळलेली झाडे व वाहने हटविण्याचे काम सुरु केले.
या भागात ही दुर्घटना घडली त्या भागात महामार्गला जोडणारी पायवाट असल्याने येथे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. ही घटना घडली तेव्हा एक व्यक्ती या पायवाटेने जात असताना थोडक्यात बचावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai