Breaking News
प्रशासकीय राजवटीत अनावश्यक खर्च
नवी मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालिका निवडणुका न झाल्याने आणि त्यानंतर त्या लांबल्याने गेली पाच वर्ष नवी मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हातात आहे. मात्र या पाच वर्षांत पालिकेच्या ठेवींना ओहोटी लागल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 2237 करोड रुपयांची ठेव होती ती आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1750 पर्यंत घसरलेली आहे. प्रशासकीय राजवटीत अनावश्यक कामांचा धुमधडाका लावल्याने ठेवींमध्ये 487 कोटींची घट झाल्याचा आरोप (पान 5 वर)
सजग नागरिक मंचाने केला आहे.
सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारातून नवी मुंबई महापालिकेच्या गुंतवणुकीबाबत तपशील मागविला होता. 1 एप्रिल 2015 ते 28 फेब्रुवारी 2025 पालिकेच्या मुदत ठेवींचा आर्थिक वर्षनिहाय तपशील ज्यामध्ये सदरील आर्थिक वर्षात 1 एप्रिलला असलेल्या ठेवींची बँकेनिहाय तपशील, सदरील आर्थिक वर्षात नव्याने केलेल्या मुदत ठेवींचा बँके निहाय तपशील, 31 मार्च अखेर असणाऱ्या ठेवींचा बँके निहाय तपशील, मुदत ठेव मोडली असल्यास त्या मागची विस्तृत कारणमीमांसा अशा प्रकाराची माहिती सजग नागरिक मंच नवी मुंबईचे प्रवर्तक सुधीर दाणी यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे मागितली होती. मुख्य लेखाधिकाऱ्यांनी 2019-20 ते 2024-25 या वर्षातील माहिती पाठवली. मात्र त्यापूर्वीची माहिती दिलेली नाही.
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 2237 करोड रुपयांची ठेव होती ती आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1750 पर्यंत घसरलेली आहे. म्हणजेच 487 कोटींची घट झाली आहे. शेवटच्या दोन वर्षात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी पालिकेने अनावश्यक बाबी वरील खर्च टाळला असता तर मोठ्या प्रमाणावर बजेट करणे शक्य होऊ शकले असते. कोरोना कालावधीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरी कामे बंद असून देखील प्रशासकीय राजवटीत पालिकेच्या ठेवींना ओहोटी लागल्याचे स्पष्ट दिसते आहे. वस्तुतः मागील 5 वर्षात लोकप्रतिनिधी अस्तित्वात नसल्याने प्रशासनावर अनावश्यक कामे मंजूर करा अशा प्रकारचा ससेमिरा नसताना देखील प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर विशेष करून स्थापत्य विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि गार्डन विभाग यांनी मनमानी पद्धतीने वारेमाप खर्च करण्याचा धडाका लावलेला आहे. मागील 5 वर्षात पालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर भर पडणे अपेक्षित होते परंतु प्रत्यक्षातील वास्तव मात्र अगदी विपरीत असल्याचे दिसते. प्रशासनालाच टक्केवारीची गोडी लागलेली असल्याने नवी मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर जनतेच्या दृष्टीने अनावश्यक कामांवर खर्च केला जात असल्याचा आरोप मंचाचे सदस्य ऍड हिमांशु काटकर यांनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai