Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ.मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, पुष्परोपाची कुंडी आणि संविधान उद्देशिकेची फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.
नेरुळ से.26 येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटकांचे नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचीत असून या ठिकाणी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार भगवान गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्या दोन्ही बाजूस जीने बनवून मध्यभागी उंच चबुतऱ्यावर भगवान गौतम बुद्ध यांचा 2.80 मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वन मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे भगवान गौतम बुध्दांच्या पंचतत्वांची अंमलबजावणी करणारे शांतताप्रिय शहर असल्याचा विशेष उल्लेख करीत गौतम बुध्दांच्या पुतळ्यामुळे या परिसराला तेजस्विता प्राप्त झाली असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुविधांच्या गुणवत्तापूर्ण पूर्ततेसोबतच सांस्कृतिक शहर म्हणून विकास व्हावा यादृष्टीने केल्या जात असलेल्या अशा कामांबद्दल त्यांनी प्रशंसा केली. बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. जगातील लोकांना युध्द नको तर शांतीचा संदेश देणारा बुध्द हवा अशा शब्दात बुध्द विचारांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. या ठिकाणाला भेट देणारे नागरिक शांती आणि समाधानाचा संदेश घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. आगामी काळात नवी मुंबईत संविधान शिल्प व भवन तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयएएस अभ्यासिका सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, उपअभियंता पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता सुनिल कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार प्रदीप शिंदे तसेच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. भन्ते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून प्रारंभ केला. महिलांच्या लेझीम पथकाने सादरीकरण करीत या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai