वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई

62 लाखाची वीजचोरी पकडली ; 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नवी मुंबई ः महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या सुचनेनुसार वीजचोरी विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, बेलापूर, पनवेल, उरण व इतर ठिकाणी 259 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्या अंतर्गत 68.28 लाखांची वीजचोरी उघड करण्यात आली आहे. 

वाशी मंडळांतर्गत फेब्रुवारी 2020 मध्ये ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, बेलापूर, पनवेल, उरण व इतर ठिकाणी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली आहे. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्याकडून वीजचोरी विरोधात धडक मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने, भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, वाशी मंडळांतर्गत माहे फेब्रुवारी 2020 मध्ये ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, बेलापूर, पनवेल, उरण व इतर ठिकाणी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत,वीज कायदा-2003 नुसार 259 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्या अंतर्गत 68.28 लाखांची वीजचोरी उघड करण्यात आली आहे. त्यापैकी 89 लोकांनी वीजचोरी पोटी  32.05 लाखांचा भरणा केलेला आहे व 9 जणांविरुद्ध वीज कायदा-2003 च्या कलम 135 नुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने गोठीवलीतील 9 जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीची हानी रोखण्याकरिता, येत्या काळात सदरची मोहीम अती तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याने कोणीही वीज चोरी करून विद्युत कायद्याचे उल्लंघन करू नये  असे आवाहन वाशी मंडळचे अधीक्षक अभियंता, राजाराम माने यांनी केले आहे.