50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

पनवेल ः कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर तळोजा मध्यवर्ती कारागृहातून दोन दिवसात सुमारे 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल देण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे. राज्यातील 8 कारागृह पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहाचा देखील समावेश आहे. कारागृह प्रशासनाने यापूर्वीच कोविडबाबत सावध भूमिका घेत कारागृहात विविध उपाययोजना राबविल्या आहेत. तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2124 एवढी आहे. 2700 च्या आसपास कैदी सध्याच्या घडीला याठिकाणी शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी 50 कैद्यांना पॅरोल देण्यात आले आहे. कोविडच्या धर्तीवर 50 कैद्यांना कारागृहातून इमर्जन्सी पॅरोल देण्यात आले आहे. पॅरोल दिलेल्या या कायद्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेले व ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे अशा कैद्याचा समावेश असल्याचे कारागृहाच्या अधीक्षकांनी सांगितले. आर्थर रॉड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल 185 पेक्षा जास्त कैद्यांना कोविडची लागण झाल्यानंतर राज्य शासनाने इतर कारागृहात कोविड बाबत विविध उपाययोजना राबविल्या आहेत.