तळोजा सीईटीपी ते फूड लँड रस्ता काँक्रिटीकरण पुर्णत्वाकडे

तळोजा : तळोजा एमआयडीसीतील नावडे फाटा येथील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सीईटीपी ते फूड लँड या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. कारखानदारांसह कर्मचारी वर्ग तसेच परिसरातील स्थानिकांना सुद्धा हा रस्ता सोयीचा असून कळंबोली स्टील मार्केटमधील अवजड वाहनांना तळोजा एमआयडीसीमध्ये प्रवेशासाठी हा रस्ता सोईस्कर आहे.

साधारणपणे सव्वा किलोमीटर लांबीच्या सीईटीपी ते फूड लँड या रस्त्याची, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाताहत झाली होती. हा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तळोजा एमआयडीसीमध्ये प्रवेश करण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून दिर्घकाळ टिकण्यासाठी याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन सतीश शेट्टी यांनी केली होती. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली होती. सध्या या रस्त्याच्या एक बाजूचे काम जवळपास पूर्णत्वाकडे गेले असून रस्त्याचा अर्धा भाग मार्च 2021 पर्यंत तयार होईल, अशी अपेक्षा आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.