सीबीडी परिसरात घरफोड्यांचे सत्र

चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी 

नवी मुंबई : सीबीडी बेलापुर परिसरात चोर्‍या घरफोड्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी मंगळवारी पहाटे सेक्टर 3 मधील बी-टेन टाईप इमारतीत आणखी एक घरफोडी करून मोठा ऐवज चोरून नेला आहे. सततच्या चोर्‍या घरफोड्यामुळे या भागातील रहिवाशी त्रस्त झाले असून येथील बी-10 टाईप वसाहतीतील रहिवाशांनी थेट पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून या चोरट्यांचा  कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.  

सीबीडी सेक्टर 3 मधील बी-10 टाईपच्या इमारतीतील एक घर बंद असल्याची संधी साधुन चोरट्यांनी त्यांचे घर फोडून त्यांच्या घरातील तब्बल 30 तोळे वजनाचे दागिने व रोख 1 लाख 60 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. दुसर्‍या दिवशी सदर कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  

या घरफोडीच्या घटनेनंतर 11 नोव्हेंबर रोजी पुन्हा चोरट्यांनी याच वसाहतीतील 3 वेगवेगळ्या इमारतीतील 3 घर फोडून त्या घरातून देखील मोठ्या प्रमाणात ऐवज चोरुन नेल्याचे या वसाहतीत राहणारे गजानन भंडारे यांनी संगितले. या घटनेनंतर 1 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बिल्डींग नंबर-6 मध्ये चोरटयांनी घरफोडी करुन या घरातुन देखील मालमत्ता चोरुन नेली आहे. सदर घरमालक हा बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातुन किती मालमत्ता चोरीला गेली हे समजू शकलेले नाही. 

अशा पद्धतीने चोरट्यांकडून मागील काही महिन्यांपासून कारवाया सुरू असल्याने येथील रहिवाशांच्या मनामध्ये चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.  येथे चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात आले असताना, मागील काही महिन्यांपासून या वसाहतीमध्ये चोरट्यांच्या कारवाया सुरूच आहेत. हे चोरटे बंद असलेली घरे हेरुन घरफोड्या करत असल्याचे व त्यांची चोरी-घरफोडी करण्याची पद्धत सारखीच असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे या वसाहतीची माहिती असलेले चोरटे या भागात घरफोड्या  करत असल्याचे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.