Breaking News
महाराष्ट्र भवनास अजित दादांची मंजुरी
नवी मुंबई ः भाजपाच्या आमदार मंदा मात्रे यांच्या मागण्या मान्य करण्याचा सपाटा महाविकास आघाडीने लावला आहे. वैद्यकीय कॉलेजसाठी लागणारा भूखंड देण्याचे जाहीर केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईतील होऊ घातलेले महाराष्ट्र भवन राज्य सरकार बांधून देईल असे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसातील आ. मंदा म्हात्रे यांचे वक्तव्य पाहता आणि आ. गणेश नाईक विरोधात उघड घेतलेली भूमिका आणि मंदाताईंच्या स्वप्नांना मिळत असलेले राष्ट्रवादीचे पाठबळ त्यामुळे त्या घरवापसी करणार का? असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून नवी मुंबईसाठी एकामागून एक प्रकल्प मंजूर करून घेण्याचा सपाटा लावला आहे. यापूर्वी त्यांनी नवी मुंबईत अद्यावत वाचनालय उभारण्याची मागणी सरकारकडून मान्य करून घेतली आणि नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून पुढाकार घेत सिडकोला नेरुळ येथे त्यासाठी भूखंड वाटप करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्यासाठी लागणारे शुल्क भरण्यास त्यांनी आयुक्त बांगर यांना राजीही केले आहे. यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. वाशी रेल्वे स्थानकाजवळ गेले चार वर्षे प्रलंबित असलेले महाराष्ट्र भवनच्या बांधकामासाठी गेल्या आठवड्यात जयंत पाटील यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी नवी मुंबईत उभे राहणारे महाराष्ट्र भवन हे राज्य सरकार बांधेल असे जाहीर करून मंदा मात्रे यांच्या याही स्वप्नाला पाठबळ दिल्याने राज्यात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या अधिवेशनात आमदार गणेश नाईक यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सिडकोने मोफत बांधून द्यावे अशी मागणी केल्यानंतर त्यास मंदा म्हात्रे यांनी जाहीर विरोध केला. गणेश नाईक दहा वर्ष पालकमंत्री असताना हा विषय त्यांनी का मार्गी लावला नाही ? असा सवाल करत नाईक या प्रकल्पाला आडकाठी आणत असल्याचा आरोप केला. त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा दादा आणि ताई असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत असून ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार मंदा म्हात्रे यांना पाठबळ देत आहे त्यावरून त्यांची लवकरच घर वापसी होईल अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai