Breaking News
नवी मुंबई ः सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे काम अखेर टाटा गु्रपला मिळाले आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी टाटांची निविदा स्विकारुन त्यांना स्विकारपत्र दिले आहे. सुरक्षा अनामत रक्कम आणि बँक गॅरेटी दिल्यानंतर टाटा ग्रुपला संबंधित कामांचे कार्यादेश देण्यात येतील असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामात राजकीय दबाव झुगारुन 150 कोटींची बचत केल्याने आयुक्तांचे कौतुक होत आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या निविदा प्रक्रियेत पाच निविदाकारांनी भाग घेतला होता. त्यापैकी दोन निविदाकार अपात्र ठरल्याने उर्वरित निविदाकारांचे आर्थिक देकार उघडण्यात आले होत. यामध्ये टाटा ग्रुपच्या टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमी. या कंपनीचा देकार सर्वात कमी ठरल्याने त्यांना हे काम देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. यापुर्वी हे काम 271 कोटींना देण्यासाठी पालिका आयुक्तांवर राजकीय दबाव होता. परंतु, आयुक्त बांगर यांनी सदर निविदा रद्द करुन फेरनिविदा केल्यावर 127 कोटी रुपयांची बोली प्राप्त झाली. ही बोली टाटा ग्रुपने दिल्याने आयुक्तांनी फेरनिविदेचा घेतलेला निर्णय योग्य असल्याची चर्चा पालिकेत आहे. टाटांना काम मिळाल्याने कामाचा दर्जा राखला जाईल असे पालिका आयुक्तांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले.
याबाबत 127 कोटी अधिक 12 टक्के जीएसटीसह 142 कोटींचे स्विकारपत्र टाटा ग्रुपला देण्यात आले आहे. यामध्ये कामपुर्ण करण्याचा कालावधी 9 महिन्यांचा देण्यात आला असून काम पुर्ण झाल्यानंतर 5 वर्षांचा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी टाटा समुहाचीच राहणार आहे. टाटांनी सुरक्षा अनामत आणि बँक गॅरेंटी दिल्यानंतर कामाचे कार्यादेश देण्यात येतील असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai