Breaking News
सरकारने वाढवलेली नगरसेवक संख्या ठरणार निर्णायक
नवी मुंबई ः नागरिकांकडून सूचना व हरकतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रभागांच्या रचनेचे स्वरूप पाहता ती महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे. आ.गणेश नाईकांचे हमखास निवडून येणार्या अनेक शिलेदारांचे प्रभाग इतर प्रभागांना जोडल्याने ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांची दमछाक होणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणी अकरा नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा घेतलेला निर्णयही निर्णायक ठरणार असल्याने निवडणुकीच्या पूर्वीच आघाडीने अर्धी लढाई जिंकल्याची चर्चा नवी मुंबईत आहे.
दोन वर्ष लांबलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने प्रभाग रचना करून नागरिकांच्या सूचना व हरकतीसाठी ती प्रसिद्ध केली आहे. देव पाण्यात ठेवून निवडणुकीची वाट पाहणार इच्छुक उमेदवारांची झोप उडवणारी ही प्रभाग रचना ठरली आहे. मंगळवारी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचनेवरुन आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी घेतला आहे. निवडणुकीपूर्वीच न्यायालयीन लढाई सुरू झाल्यावर त्या निवडणुकीत चांगलाच रंग भरला जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 17 मे पूर्वीच निवडणुका घेण्याच्या हालचाली राज्य निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी युती केली आहे. सुरुवातीला एक सदस्य प्रभाग रचना स्वीकारणार्या महाविकास आघाडीने अचानक तीन सदस्यीय प्रभाग रचना जाहीर करून शेवटच्या क्षणी नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेऊन आश्चर्याचा धक्का दिला. या निर्णयाला आव्हान देणार्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे.
नुकत्याच पालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीला फायदा करून देण्याच्या उद्देशाने हि प्रभागरचना केल्याचा आरोप गणेश नाईकांसह अनेक माजी नगरसेवकांनी केला आहे. या प्रभागरचनेत नाईकांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्या सुरज पाटील, रवींद्र इथापे, नेत्रा शिर्के, सुधाकर सोनावणे व अनंत सुतार सारख्या दिग्गजांचे प्रभाग गायब झाले असून ते इतर प्रभागाला जोडले आहेत. एकूण 122 नगरसेवक असणार्या महापालिकेला 41 प्रभागात विभागले आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या वाढल्याने व मागील पालिका निवडणुकीत ऐरोली विभागाने शिवसेनेला साथ दिल्याने यावेळी सेनेचे पारडे जड दिसत आहे. त्याचबरोबर बेलापूर विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या न वाढल्याने आणि दादा-ताई वादाचा फटका नाईकांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रभाग रचनेला नाईक कोर्टात कसे आव्हान देतात आणि न्यायालय त्यास कसा प्रतिसाद देते यावर भाजपचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सूचना हरकतींसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रभागरचनवरून तरी महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे चित्र नवी मुंबईत असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यात जोश पसरला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai