Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी पालिकेचा अर्थसंकल्प बनविण्याचे काम हाती घेतले आहे. साधारणतः साडेतीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असणारी नवी मुंबई महानगरपालिका यावेळीही कोणतीही कर वाढ नवी मुंबईकरांवर लादणार नसल्याचे संकेत पालिकेतून मिळत आहेत.
साधारणतः फेब्रुवारी महिन्यात पालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांकडून बनवून तो महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे कलम 95 अन्वये स्थायी समितीला सादर करण्यात येतो. त्यानंतर कलम 95 अन्वये स्थायी समिती सभापती हे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी सादर करते. गेल्या दोन वर्षात पालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने व शासनाने प्रशासकाची नेमणुक केली असल्याने प्रशासकाच्या संमतीने या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात येते. प्रशासक अभिजीत बांगर यांनी सन 2021-22 कालावधीसाठी 270 लक्ष रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात 3197 कोटी रुपयांचे उत्पन्न गृहित धरुन 2970 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता.
पालिका प्रशासक अभिजीत बांगर यांनी 2020-21 चे सुधारित अंदाजपत्रक आणि 2022-23 साठी मुळ अर्थसंकल्प बनविण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये पालिकेला शासनाकडून एलबीटी कर परतावा पोटी 1284 कोटी उत्पन्न आणि मालमत्ता करातून 550 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पालिकेला सन 2020-21 काळात 527 कोटी रुपये उत्पन्न मालमत्ता करापोटी मिळाले आहेत. सन 2021-22 मध्ये आतापर्यंत पालिकेला 490 कोटी रुपये मालमत्ता करातून मिळाले असून त्यापैकी 58 कोटी रुपये अभय योजनेतून मिळाले आहेत. 2020-21 या वर्षात अभियांत्रिकी विभागाने रु.1000 कोटींचा रेकॉर्ड ब्रेक खर्च केला आहे. आरोग्य विभागाने 170 कोटी, घनकचरा विभागाने 196 कोटी, शिक्षण विभागाने 42 कोटी तर 450 कोटी रुपये प्रशासनावर आतापर्यंत खर्च झाले आहेत. गेल्या अर्थसंकल्पात 300 कोटी रुपयांचे उत्पन्न नगररचना विभागातून गृहित धरण्यात आले होते, त्यापैकी 60 कोटी रुपये मिळाल्याचे सुत्रांकडून कळत आहे. पालिकेकडे सध्या 2000 कोटी रुपयांच्या ठेवी असून या येणार्या अर्थसंकल्पात 142 कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरा, 250 कोटींचे अरेंजा कॉर्नर पुल तसेच ऐरोली येथील 350 कोटी रुपयांचा नवीन पुल प्रस्तावित असल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
गेले 25 वर्ष नवी मुंबई महापालिकेने कोणतीही कर वाढ नवी मुंबईकरांवर लादलेली नाही. 2020 पासून नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनीही मंजुर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केली नाही. त्यामुळे याही वर्षी पालिका आयुक्त व प्रशासक अभिजीत बांगर कोणतीही कर वाढ करणार नसल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai