Breaking News
235 रु. प्रतिकिलो जलरोधक रसायन 1945 रुपयाला खरेदी
नवी मुंबई ः ऐरोलीतील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व त्यावर होत असलेला खर्च हा नवी मुंबईत नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सध्या आंबेडकर भवनात मार्बल आच्छादनाचे काम सुरु आहे. बुधवारी ठेकेदाराच्या निष्काळजीने लागलेल्या आगीतून भवनाच्या डोममधून निघणार्या धूरावर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले. परंतु, भवनाच्या जलरोधक कामासाठी कोट्यवधींची रसायने अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या धूरावर पालिका आयुक्त कसे नियंत्रण मिळवतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृत्यर्थ ऐरोली येथे भवन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक वर्ष रखडलेले हे काम कसेबसे पूर्ण करुन ठेकेदाराने ते महापालिकेला हस्तांतरित केले. या कामाच्या दर्जाबाबत आणि दिरंगाईबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज उठवला होता. या वास्तूच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून तत्कालीन महापौर सुधाकर सोनावणे यांनी ज्याप्रमाणे दिल्लीतील लोटस टेंपलला मार्बल आच्छादन केले त्याप्रमाणे या वास्तूवरही मार्बल आच्छादन करावे अशी मागणी लावून धरली होती. पहिल्याच पावसात आंबेडकर भवनात अनेक ठिकाणी पाण्याची गळती झाल्याने तत्कालीन शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी मार्बल आच्छादनापूर्वी जलरोधक म्हणजेच वॉटर प्रूफिंगचे काम करावे यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवली. वास्तविक पाहता ज्या ठेकेदाराने हे बांधकाम केले त्याच्याकडूनच गळती रोखण्याचे काम पुर्ण करून घेणे अपेक्षित असताना कोट्यवधींची अनावश्यक नवीन निविदा प्रक्रिया पालिकेकडून राबवण्यात आली.
नवीन तंत्रज्ञानावर आधारित जलरोधकाचे काम करण्याचा निर्णय घेऊन या क्षेत्रातील नामवंत कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्या ऐवजी मे.वेदर शील्ड या एकाच कंपनीकडून शहर अभियंता यांनी दरपत्रक मागविले व त्याच दरांवर आणि कामाच्या स्वरुपावर अंदाजपत्रक बनवले. संबंधित कंपनीने दिलेला प्रस्ताव आणि त्यासंदर्भात दिलेले दर याची कोणतीही शहानिशा कार्यकारी अभियंता यांनी न करता त्या अंदाजपत्रकाला प्रशासक तथा आयुक्त अभिजीत बांगर यांची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केली. हे काम महेंद्रा रियलेटर्स व इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून यापूर्वी त्यांच्याकडून वाशी सेक्टर-8 येथील सेक्टर-3 उच्च स्तरीय व भूस्तरीय जलकुंभांची अशाच प्रकारे दुरुस्ती करण्यात आली आहे.
निविदेमध्ये आंबेडकर भवनाच्या डोमवर, पहिल्या मजल्यावरील पोडियम तसेच वास्तुच्या सभोवताली जलरोधक मुलामा देण्याचे निश्चित करण्यात आले. या कामासाठी तज्ञांनी सुचवल्याप्रमाणे एशियन पेंट्स या कंपनीचे पॉलीयॉल आणि आयसोसीनेट या दोन केमिकल्सचे मिश्रण वापरून दोन एमएम जाडीचा थर देण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी प्रति चौरस मीटर दोन किलो केमिकल वापरण्याचे तांत्रिक तपशिलात नमूद करण्यात आले. या दोन्ही केमिकल्सचा सध्याचा बाजारभाव 220 ते 250 रुपये प्रति किलो असून सरासरी 235 रुपये प्रति किलो आहे. मात्र संबंधित विभागाने हे रसायन प्रतिकिलो 1945 रुपयांना खरेदी केले आहे. अंदाजपत्रकात 3123 क्षेत्रफळ गृहीत धरण्यात आले असून निविदेतील तांत्रिक तपशिलानुसार या कामासाठी 6242 किलो केमिकल्स लागणार होते. बाजारभावाप्रमाणे त्यापोटी 14 लाख 67 हजार 810 रुपये खर्च अपेक्षित होता परंतु त्या कामासाठी पालिका 1 कोटी 19 लाख 81 हजार 498 रुपये मोजणार आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी शहर अभियंता विभागाने पालिकेच्या तिजोरीला लावलेली गळती म्हणजे रोगापेक्षा उपचार भयंकर असल्याची चर्चा आहे. या गळतीने कोणाची तुंबडी भरली जाणार आहे? असा प्रश्न सध्या नवी मुंबईकरांना पडला आहे. पालिकेत एवढी मोठी आर्थिक अनियमितता होत असताना पालिकेचा लेखाविभाग व लेखा परीक्षण विभाग काय करत होता याचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे जलरोधक रसायने खरेदीत झालेल्या या अभिजात घोटाळ्याची दखल पालिका आयुक्त बांगर कशापद्धतीने घेतात याकडे आता पालिकेतील अधिकार्यांसह नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
सदर जलरोधकाचे काम पुर्ण झाले आहे. सदर कामात आर्थिक अनियमितता झाली असेल तर त्याबाबत विशेष लेखा परिक्षणाचे आदेश देण्यात येतील. संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यावरच योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात येतील किंवा तक्रार निकाली काढली जाईल. - अभिजित बांगर, आयुक्त, न.मुं.मपा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे